संभाजीनगर | प्रेमविवाह केल्याच्या रागाच्याभरात युवतीच्या आईसह भावाने कोयत्याने शीर तोडून धडावेगळे करून निर्घृण खून केल्याची घटना वैजापूर येथे रविवारी दुपारी घडली. कीर्ती ऊर्फ किशोरी थोरे असे मृत विवाहित युवतीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी आई शोभा मोटे आणि भाऊ संकेत मोटे यांनी थेट पोलीस ठाणे गाठून या खुनाची कबुली दिली.
गोयगाव येथील मोटे कुटुंबातील कीर्ती हिने २१ जून २०२१ रोजी गावातीलच अविनाश थोरे या तरुणाशी प्रेमविवाह केला होता. याला मोटे कुटुंबीयांचा विरोध होता. कीर्तीची आई व भावाने कट रचून तिच्या घरी येणे-जाणे सुरू केले. रविवारी दुपारी आई व भाऊ तिला भेटायच्या निमित्ताने तिच्या घरी गेले. त्यावेळी तिचा पती अविनाश झोपलेला होता.
कीर्ती चहा करण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्यावर तिच्या पाठोपाठ तिचा भाऊ आणि आई पण गेली. यादरम्यान आईने तिला धरून ठेवत भावाने कोयत्याने तिच्या मानेवर सपासप वार करून कीर्तीचे शिर काही क्षणातच धडावेगळे केले. पती अविनाश याने हा घटनाक्रम पाहिल्यावर तो घाबरून घराबाहेर पळाला. यानंतर आरोपी आई व भाऊ याने धडावेगळे केलेले शीर ओट्यावर ठेवून थेट वीरगाव पोलीस ठाणे गाठले आणि खुनाची कबुली दिली.