राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जूनला निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांसाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यसभेच्या या निवडणुकीसाठी बरेच चेहरे चर्चेत आहेत. यातच संभाजीराजे छत्रपती यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे ही निवडणूक रंजक झाली आहे. शिवसेनेने आपला सहावा उमेदवार कोल्हापूरातून दिला आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणेच भाजप आपला दुसरा उमेदवार कोल्हापूरचाच देणार असून यासाठी धनंजय महाडिक यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे.
केंद्रीय मंत्री पियूष गोयल हे भाजपचे राज्यसभेसाठी पहिले उमेदवार निश्चित मानले जात आहेत. भाजपचे दुसरे उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती भाजपमधील विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तर तिसरा उमेदवार द्यायचा की नाही, याबद्दल अजून चर्चा सुरू आहे. मतांची जुळवाजुळव कशी करता येईल, हे पाहून निर्णय घ्यावा लागेल. महाराष्ट्रात येत्या काळात निवडणुका असल्याने पराभव झाल्यास इमेजला धक्का बसू शकतो, अशीही शक्यता असल्याचे सुत्रांकडून समजते.
कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांच्यावर राज्यसभा खासदारकीच्या माध्यमातून जबाबदारी देऊन येथील आगामी महापालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याची कामगिरी त्यांच्यावर देण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, याआधी खासदारकी असताना त्यांना लागोपाठ तीन वर्षे संसदरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते