सध्या शिवसेना नेत्यांच्या अडचणीत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत असून केंद्रीय तपास यंत्रणेने दोनच दिवसांपूर्वी संजय राऊत यांची मालमत्ता जप्त केली होती आता त्या पाठोपाठ शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत.
यामध्ये भायखळा येथील फ्लॅट्स, हॉटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचा समावेश आहे. या प्रकरणात लवकरच सक्तवसुली संचलनालयाची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढू शकतात.
शिवसेना नेते यशवंत जाधव गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर आहेत. जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या ४१ मालमत्तांवर आयकर विभागानं टाच आणली आहे. त्यात भायखळ्यातील एकाच इमारतीमधील ३१ फ्लॅट्सचा समावेश आहे. याशिवाय याच भागातील एम्पिरियल क्राऊन हॉटेलवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वांद्र्यातील ५ कोटींचा फ्लॅटदेखील जप्त करण्यात आला आहे.
आयकर विभागाच्या कलम १३२ ९(बी) च्या अंतर्गत यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते असलेले जाधव भायखळ्यात वास्तव्यास आहेत. याच भागातील एका इमारतीत त्यांचे तब्बल ३१ फ्लॅटस आहेत. या सगळ्या फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच आयकर विभागानं जाधव यांच्या मालमत्तांवर धाड टाकली होती. ही कारवाई ३ दिवस चालली होती.