नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या स्थायी समिती निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिली होती. त्यात आता काही महिन्यात होणाऱ्या नाशिक मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजपा एकत्र निवडणूक लढतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या महाविकास आघाडीचा सामना करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्रिपणे निवडणुका लढू शकतात, असे सूचक वक्तव्य भाजपा नेत्यांकडून केले जात आहेत. सध्या नाशिकमधील भाजपा व मनसेच्या नेत्यांतील जवळीक अधिकच वाढली असून, शिवसेनेसमोर आव्हान उभे करण्याची तयारी दोन्ही पक्षांनी सुरू केली आहे. त्यामुळे स्वबळावर भगवा फडकवण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेला भाजप-मनसेच्या आघाडीचा सामना करावा लागेल.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसेचे भाजपा बरोबर संबंध अधिक जवळ आले होते. त्यात सेनेने मनसेचे सात नगरसेवक फोडल्यानंतर नाराज मनसेचा भाजपाकडे काळ वाढला होता.
तसेच मुंबईपाठोपाठ नाशिकमध्ये देखील मनसे आणि भाजपचे संबध अधिक घट्ट होत आहेत. नाशिकमध्ये स्थायी समितीत समसमान संख्याबळामुळे भाजपला कोंडीत पकडण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेला मनसेने जोरदार झटका दिला आहे. महापौर निवडणुकीपाठोपाठ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीत भाजपला पुन्हा एकदा मनसे पाठिंबा देणार आहे. मनसेचा एकमेव सदस्य सलीम शेख हे भाजपच्या गोटात सहभागी झाल्याने भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे.