मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात भाजपा नेते आणि माजी उख्यमंत्री नारायण राणे यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून काल शपथ घेतली. नारायण राणे यांना महाराष्ट्रात शिवसेनेला शह देण्यासाठी आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना या संदर्भात विचारण्यात आले होते.
राणे म्हणाले की, ‘१९९९ ला मुख्यमंत्री झालो. त्यानंतर अनेक चढउतार आले. आता मोदींच्या नेतृत्वात हे पद मिळालं आहे. त्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावेन, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केलाय. तसंच शिवसेनेला शह देण्यासाठी तुम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याची चर्चा असल्याचं एका पत्रकाराने विचारलं.
यावर उत्तर देताना मंत्री राणे म्हणाले की, कुणाला शह देण्यासाठी की अन्य कशासाठी मला मंत्री केलं हे माहिती नाही. फक्त मंत्री केलंय एवढं नक्की’, असं मिश्किल उत्तर राणे यांनी यावेळी दिलं.
तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आभारी आहे. त्यांच्यामुळेच मी आज केंद्रीय मंत्री बनलो आहे. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनात माझ्यावर जी जबाबदारी देण्यात येईल ती योग्यरित्या सांभाळेलअसे विधान सुद्धा त्यांनी केले होते.