राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असून महाविकास आघाडी सरकार तीन तर भाजप दोन जागांवर सहज विजय मिळवू शकतात. पण, सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. यात काही दगाफटका होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवले आहे. शिवसेनेचा आपल्या आमदारांवर विश्वास नाही का, असा सवाल भाजपकडून विचारला जात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी महत्वाची माहिती दिली.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये थेट लढत होत आहे. या निवडणुकीत आमदार फुटू नयेत यासाठी सर्वांची धडपड सुरु आहे. दरम्यान, शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना हॉटेलमध्ये का ठेवले, याबाबत संजय राऊत यांनी माहिती दिली. ‘राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीची प्रक्रिया ही तांत्रिक आणि किचकट असते. हे मतदान नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने असते. त्याबाबत आमदारांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेच्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे,’ असे स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिले.
यावेळी संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली. ‘फक्त आम्हीच नाही तर भाजप आणि काँग्रेसच्या आमदारांनाही हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. मग फक्त शिवसेनेच्याबाबतीच प्रश्नचिन्ह का उपस्थित केले जात आहे? तुमचं ते गेटटुगेदर आणि आमच्याबाबतीत लगेच प्रश्न उपस्थित केले जातात. मी खात्रीने सांगतो की, महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील. 10 जून रोजी रात्री आठ वाजेपर्यंत निकाल स्पष्ट झालेला असेल’, असेही राऊत यांनी म्हटले.