भाजपा आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमधील शाब्दिक युद्ध मागच्या काही दिवसांपासून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राला पाहावयास मिळत आहे. त्यात सातारा नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
सातारा नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पॅनेल उभं करण्यात आले असून दीपक पवार या निवडणुकीचे नेतृत्व करतील असे आमदार शशिकांत शिंदे यांनी सांगितले होते. यामुळे भाजपा आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष पुन्हा वाढण्याचे चिन्हं दिसून येत आहे. मात्र यावेळी शिंदे यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर दिली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीत आल्यास नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देऊ असे जाहीर केले होते. नेतृत्व कोण करणार या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी, “शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर ते करतील. नाही आले तर मी आणि दीपक पवार करु”, असे उत्तर शिंदे यांनी दिले होते. यावर आता शिवेंद्रराजे काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.