राज्यसभेच्या उमेदवारीबाबत कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींचा स्पष्टवक्तेपणा आवडला, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा संभ्रम दूर झाला. त्याबद्दल शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी रविवारी सकाळी थेट न्यू पॅलेसवर जाऊन शाहू छत्रपती यांचे आभार मानले. यावेळी शाहू छत्रपती आणि संजय राऊत यांच्या प्रदीर्घ चर्चा झाली तसेच राऊतांनी आभार सुद्धा मानले होते.
यावेळी शाहू छत्रपतींच्या शिवसेनेतील आठवणींना उजाळा दिला. राज्यसभेच्या उमेदवारीवरून शाहू छत्रपती यांनी शनिवारी, संभाजीराजे यांचा निर्णय चुकल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे शाहू छत्रपती व राऊत यांच्या या भेटीला महत्त्व आले होते. यावेळी संजय राऊतांनी दूरध्वनीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे छत्रपती शौ महाराजांबरोबर बोलणे सुद्धा करून दिले होते.
छत्रपती संभाजीराजे यांच्या राज्यसभा उमेदवारीवरून सुरू असलेल्या राजकारणाबाबत विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. पश्चिम महाराष्ट्रात छत्रपती संभाजीराजे यांच्या रूपाने आश्वासक नेतृत्व काही लोकांना तयार होऊ द्यायचे नाही. अशाच काही किडक्या डोक्याच्या लोकांनी शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली आहे. छत्रपती संभाजीराजेंवरून राजकारण करणारे हे असे लोक उघडे पडतील, असे फडणवीस रविवारी म्हणाले.