नवी दिल्ली | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित केले आहे.मात्र दुसरीकडे केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा आमदार आणि खासदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे त्यामुळे एकाच वेळी दोघांनी आमंत्रण दिल्यामुळे यात काय डिनर डिप्लोमसी होईल, असा कयास लावला जात आहे.
संसदीय अभ्यास वर्गासाठी महाराष्ट्रातील जवळपास ११० आमदार दिल्लीत दाखल झाले आहेत. त्याचा संसदीय कामकाज, कार्यप्रणालीसंदर्भात दोन दिवस अभ्यासवर्ग संसदेत होणार आहे. हे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ६, जनपथ या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या आमदारांना भोजनासाठी निमंत्रित केले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेचे खासदार हजेरी लावणार आहेत.
भाजपचे नेते व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही २, सफदरजंग लेन या निवासस्थानी स्नेहभोजन आयोजित केले आहे. या भोजनाला भाजपचे आमदार व खासदार उपस्थित राहणार आहेत. दोन्ही नेत्यांनी एकाच दिवशी स्नेहभोजन आयोजित केल्याने राजकीय डिनर डिप्लोमसी होईल, असा अंदाज बांधला जात आहे.