राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधल्यानंतर आता या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला प्रतिउत्तर दिले आहे. शरद पवारांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ‘दोन दिवसांपूर्वी भोपाळमध्ये आदिवासी संमेलन झाले, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आदिवासी शब्द न वापरता, वनवासी शब्द वापरला,’ असा आरोप शरद पवारांनी केला होता. त्याला आता देवेंद्र फडणवीसांकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर दोन दिवसांपूर्वी झालेल्या आदिवासी संमेलनाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी संमेलनाला संबोधित करताना दिसत आहेत. आपल्या भाषणात मोदींनी आदिवासी हा शब्द वापरल्याचे दिसत आहे. हा विडिओ शेअर करत फडणीवसांनी पवारांचा आरोप खोदून काढला आहे.
हाच व्हिडिओ पोस्ट करत फडणवीसांनी लिहीले की, ‘शरद पवारजी, आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत. आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे. ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.