मुंबई | उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच त्यांच्या नातेवाईकांवर आणि निकटवर्तीयांवर काल आयकर विभागाच्या पथकांनी छापे टाकले. त्यामध्ये अजित पवारांच्या बहिणीच्या कार्यालयांचा समावेश आहे. या छाप्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सोलापुरात विरोधकांवर जोरदार टोले लगावले. काल अजित पवारांच्या घरी पाहुणे येऊन गेले. पण पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबात वाटत नाही, असा टोला पवारांनी लगावला. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
अजित पवारांच्या नातेवाईकांच्या घरावर पडलेल्या छाप्यांवर बोलताना शरद पवारांनी त्यांना ईडीने पाठवलेल्या नोटिशीची आठवण सांगितली. विधानसभा निवडणुकीआधी मला बँकेसंदर्भात ईडीची नोटीस आली होती. मी त्या बँकेचा सभासदही नव्हतो, ना त्या बँकेकडून मी कधी कर्ज घेतलं होतं. त्यानंतर काय झालं, ते सगळ्यांनी पाहिलं. मला ईडीची नोटीस दिली आणि सबंध महाराष्ट्रानं भाजपाला येडी ठरवलं, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला होता.
लखमीपूर घटनेवरही पवारांनी जोरदार टीका केली. शांततेत निदर्शनं करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजपा नेत्यांनी गाड्या घातल्या; शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून एक प्रकारे त्यांची हत्याच केली, असा गंभीर आरोप पवारांनी केला. लखीमपूरमधील घटनेच्या निषेधार्थ ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामध्ये सहभागी होऊन शांततेच्या मार्गानं निषेध नोंदवा, असं आवाहन त्यांनी केलं.