मुंबई | : राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. फक्त इतकेच नाही तर मलिक यांच्या सुटकेसाठी निदर्शनेही काढण्यात येत आहेत. तर दुसरीकडे नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर ५ मार्च प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवाब मालिकांवर कारवाई फक्त राजकीय हेतुने केली जात असून ते मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे. तसेच नारायण राणेंना वेगळा न्याय आणि नवाब मालिकांना वेगळा न्याय का? असा सवालही पवारांनी यावेळी केला. दरम्यान, पवारांच्या या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिले आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना राणे म्हणाले की,’मी शरद पवारांचे स्टेटमेंट ऐकले. वा पवारसाहेब, काही बोलावे की कीव करावी हे कळेना. आमचा कुणी दाऊद दोस्त नाही, तो देशद्रोही आहे. त्याच्याशी मलिकांचे संबंध, म्हणून आम्ही राजीनामा मागतोय.’ तसेच तुम्ही आमचे राजीनामे मागता. तुम्ही हेच केलं आयुष्यभर, हीच तुमची पुण्याई आहे, असेही राणे म्हणाले.