मुंबई | शनिवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात सकाळी भेट घेतली होती. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला उधाण आले होते. या भेटीवर राष्ट्र्वादीने स्पष्टीकरण देत कृषी कायद्यात सुधारणा करावी तसेच सहकार क्षेत्रातील अडचणी या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलून दाखले होते. आता या भेटीवर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भाष्य केले आहे.
शिवसेना आणि काँग्रेस देखील वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत. त्यानंतर देखील आज ते सोबत आहेत. मग भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र का येऊ शकत नाहीत?. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं देशाचं संविधान विविध विचारांच्या लोकांना एकत्र आणणारं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांनी आपला निर्णय बदलावा अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. राज्यात शिवसेनेला दिलेला पाठिंबा त्यांनी काढून घ्यावा. काँग्रेस पक्ष देखील वारंवार तुम्हाला इशारा देत आहे. नाना पटोले हे शरद पवारांविरोधात वारंवार वक्तव्य करत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं अन् राज्यात भाजप-राष्ट्रवादीनं सरकार स्थापन करावं. पवारांनी आता एनडीएसोबत येण्याची वेळ आली आहे, असंही रामदास आठवले म्हणाले आहेत.