(मुंबई प्रतिनिधी) टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले शिवसेना नेते संजय राठोड आज सहकुटुंब पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहे. संजय राठोड यांच्याकडून यावेळी शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. पोहरादेवी येथे संजय राठोड बंजारा समाजाला उद्देशून भाषण करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. यासाठी जवळपास १५ ते २० हजार लोक जमतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य करत थेट मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
मुनगंटीवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी कोरोना नियमांचं पालन करा, गर्दी करू नका, अशा सूचना केल्या आहेत. पण ठाकरे सरकारमधील मंत्रीच आता गर्दी करून कोरोना नियमांची पायमल्ली करत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला न जुमानता ते पोहरादेवीत येत आहेत.
संजय राठोड यांनी एकप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला भीक घातलेली नाही. त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे हे एक प्रकारे शक्तीप्रदर्शन नसून मुख्यमंत्र्यांसाठीचं आवाहन प्रदर्शन आहे असे मुनगंटीवार यांनी बोलून दाखविले आहे.