आमदार नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर घणाघाती आरोप लगावले होते. त्यानंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले होते. तसेच लागवलेल्या आरोपाबद्दलराणे यांनी माफी मागावी अन्यथा कायदेशीर नोटीसाला उत्तर द्यावे असे त्यांनी बोलून दाखविले होते.
आता सरदेसाई यांनी केलेल्या आरोपांना भाजपा आमदार नितेश राणे यांनी पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना इशारा दिला आहे. सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. मात्र, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशारा भाजप नेते नितेश राणे यांनी दिला आहे.
राणे म्हणाले की, आम्ही ३९ वर्षे बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली आहे. त्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. तुम्ही आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काढत असाल तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणं बाहेर काढू का? ही माहिती बाहेर आली तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी सांगितले.