सातारा : गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी सातारा शहर पोलीस ठाण्याला थेट दुचाकीवरून अचानक भेट दिली. पोलीस ठाण्यातील बेशिस्तीमुळे संतापलेल्या ना. देसाई यांनी पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. दररोज वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्यांचा दाखला देत दिवाळीपूर्वी कारभार सुधारा अन्यथा शासन स्तरावरून कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
याबाबत माहिती अशी, कारभारी बदलल्यापासून सातारा शहर पोलीस ठाण्याला अवकळा येत चालली आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे अनेक घटनांवरून दिसत होते. याबाबत विविध वृत्तपत्रांनी वृत्त प्रसिद्ध केले होते. शहर पोलीस ठाण्याच्या कारभाऱ्यांच्या वर्तणुकीला लगाम घालण्याची मागणी चव्हाट्यावर आणली.
या वृत्ताची गंभीर दखल घेऊन शंभूराज देसाई यांनी सोमवारी शहर पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. पोलीस ठाण्यातील सर्व विभागांची पाहणी करून त्यांनी उपस्थित तक्रारदारांशी संवाद साधला. त्यानंतर देसाई यांनी सातारा शहर पोलीस ठाण्याच्या अधिकारी दालनात जाऊन सध्या सुरू असलेल्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. दिवाळीपूर्वी कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा त्यांनी पोलीस निरीक्षकाना दिला आहे.