मुंबई | भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेल्या अटकेमुळे महाराष्ट्रातील राजकारण हे अक्षरश: ढवळून निघालं आहे. राज्यात शिवसेनेची, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची एकत्र सत्ता आल्यापासून पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंवर टीका केल्यामुळे आक्रमकपणे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यामुळे आता पुढील काही दिवस तरी हा संघर्ष अशाच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळू शकतो. असं असतानाच आता शिवसेनेचे खासदार आणि ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी सकाळी-सकाळीच एक सूचक ट्वीट केलं आहे.
राज्यात २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर जो सत्ताबदल झाला त्यात संजय राऊत यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची होती. त्यावेळी संजय राऊत हे साधरण दररोज आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन काही सूचक अशा स्वरुपाचे ट्विट किंवा कवितेच्या ओळी शेअर करायचे. ज्याचे अनेक वेगवेगळे राजकीय अर्थ त्यावेळी लावले जायचे. असं असताना आता मागील दोन दिवसांपासून राऊतांनी पुन्हा तशाच स्वरुपाचं ट्विट करणं सुरु केलं आहे.
संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा सूचक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘शक्ती मुद्रा’ असलेला एक फोटो शेअर केला आहे. राऊत यांच्या या फोटोचे आता राजकीय विश्लेषक वेगवेगळे अर्थ लावू लागले आहे. राणेंच्या अटकेनंतर महाराष्ट्रात जो काही आगडोंब उसळला आहे. तो आता इतक्यात थांबण्याची शक्यता नाही. त्यामुळे आगामी काळात शिवसेना विरुद्ध राणे समर्थक असा टोकाचा संघर्ष पाहायला मिळू शकतो.