मुंबई | मागच्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणेच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांना त्रास देण्यात येतोय, अशी तक्रार महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. कालच ईडीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिकांना अटक केल्यानंतर आता राज्यातील राजकारणात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपविरोधात आंदोलने देखील केली आहेत.
अशातच शिवसेना खासदार संजय राऊत आक्रमक झाल्याचं पहायला मिळतंय. संजय राऊतांनी केंद्र सरकारवर आणि ईडीवर कडाडून टीका केली आहे. त्याला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांची मानसिक स्थिती खराब आहे आणि हीच ब्रेकिंग न्यूज आहे, असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत यांना तक्रारी करण्यासाठी कोणी ऑथोराईज केलंय का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्याची मानसिक स्थिती खालावली आहे तसेच संजय राऊतांना प्रेस घ्यावी आणि बेजबाबदारपणे बोलावं, यासाठी काही ऑथोराईज केलंय का ? त्यांच्या बेजबाबदार बोलण्याला आम्ही उत्तर का द्यावं?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी विचारला आहे.