खासदार संजय राऊत हे आज चौथ्यांदा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेनेतर्फे पक्षाचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पवार हेसुद्धा उद्याच आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. शिवसेनेच्या नेत्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राज्यसभेच्या सहाव्या जागेसंदर्भात निर्णय घेतल्याची माहिती संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली. पक्षाच्या कार्यकर्त्यालाच उमेदवारी देण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याकडे प्रत्येकी एक जागा जिंकण्याइतकी मते आहेत. तर सहाव्या जागेसाठीही शिवसेनेने आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. भाजपकडून पीयूष गोयल आणि विनय सहस्रबुद्धे हे उमेदवार राज्यसभेसाठी आहेत.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी 1 वाजता विधान भवन येथे राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरतील, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली. यावेळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि अन्य पक्षांचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहेत, असे राऊत यांनी सांगितले. त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे काय निर्णय घेतायत हे पाहावे लागणार आहे.