मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटीच्या हप्ता वसुलीचा आरोप लावल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापलेले असताना दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी युपीए अध्यक्षपदावरून केलेल्या वक्तव्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
संजय राऊत हे युपीएचे सदस्य नाहीत. त्यांना राष्ट्रवादी पक्षाने प्रवक्ता केलं आहे का? हे आम्हाला समजल्यावर आम्ही उत्तर देऊ, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला होता. आता पटोले यांच्या या टिकेला संजय राऊत काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.
तसेच महाविकास आघाडीमध्ये असलेल्या वाद-विवाद विषयी सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना पटोले म्हणाले की, ‘महाविकास आघाडी सरकार पहिल्यापासूनच एकजूट आहे. हे सरकार पाच वर्ष चालणार. जे काही सध्या आरोप केले जात आहेत. त्याला उत्तर देण्याची योग्य वेळ महाविकास आघाडीने ठरवली आहे, त्यामुळे आता त्यांच्या उत्तराची सुरुवात झालेली आहे’ असंही पटोले म्हणाले.