राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना खासदार छत्रपती संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक देऊन कोल्हापुरात १६ जून पासून आंदोलनाला सुरवात केली होती. आता या आंदोलनात छत्रपतींचा मावळा केर योगेश यांनी फेसबुक पोस्ट लिहून मराठा आरक्षणाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. काय लिहिले आहे फेसबूक पोस्टमध्ये वाचा.
संभाजीराजेंनी ठरवलं असतं तर सरकार सुद्धा पाडू शकले असते. असे आमच्या राजकीय मित्राने म्हटले. आम्ही लगेच विनाविलंब उत्तर दिले. ‘संभाजीराजेंना सरकार पाडण्यात इंटरेस्ट नाही तर लोकांच्या पदरात जास्तीत जास्त गोष्टी पाडण्यात इंटरेस्ट आहे.’ राजेंची ही भूमिका मागच्या सरकार वेळी पण होती आणि ह्या सरकार वेळी सुद्धा ती कायम आहे.
पयावर थोडा विचार करत असताना मागचा इतिहास नजरेसमोरून तरळून गेला. मराठा क्रांती मूक मोर्चाचा सर्वोच्च बिंदू म्हणजे मुंबई वर चालून गेलेला लाखोंचा जनसागर. त्यावेळी भाजप चे सरकार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित विरोधी पक्षातील सुद्धा मोठमोठ्या नेत्यांच्या मनात धडकी भरली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला आणि मुंबईमध्ये अथांग सागराप्रमाणे पसरलेला मराठा समाज. यापूर्वी मुंबापुरीने केवळ अरबी समुद्राच्या रौद्र लाटा पाहिल्या होत्या पण तेंव्हा मराठ्यांची सुनामी अनुभवली असे म्हटले तरी अतिशयोक्ति होणार नाही.
सरकार बोलण्या करत होते. समन्वयक लोक चर्चे साठी गेले खरे पण लोकांच्या समोर येणार कोण? सरकार मधील कोणीही नेता येऊन चालणार नव्हता. विरोधी पक्षातील मराठा नेत्यांना सुद्धा विचारणा केली गेली की लोकांपुढे जाऊन त्यांना सुखरूप घरी जाण्याची विनंती कराल का? मला इथे त्यांची नावे घ्यायची नाहीत. पण ते म्हणाले की आमच्या क्षमते पलीकडे ही गोष्ट आहे. काहींनी तर लगेच आमच्या ठरलेल्या बैठका आहेत म्हणून पळ काढला.
तेंव्हा एक नाव सर्वांना सुचले, ते म्हणजे छत्रपती संभाजीराजे. जेंव्हा विधान भवनात समन्वयक आणि सरकार ची बैठक सुरू होती तेंव्हा संभाजीराजे काय करत होते? तर गेट वर उभे राहून उशिरा येणाऱ्या समंव्यकांची आतमध्ये पाठवण्याची सोय करत होते. कारण नेमके समन्वयक कोण? हे पोलिसांना कसे कळणार? म्हणून राजे तिथे एकेकाला आत सोडण्यासाठी उभे होते. शेवटी राजेंना निरोप पाठवला गेला की आमच्या बोलण्या झाल्या आहेत. आपण सुद्धा त्या बैठकीत मार्गदर्शन करावे. मग राजे आत गेले. आणि मागे एक खुर्ची होती तिथे राजे बसले. समाजाच्या मागण्या उघड होत्या जास्त काही बोलण्याची स्थिती नव्हती.
सरकार नी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली गेली. पण खरा पेच पुढे होता. हे सगळं जाऊन लोकांना कोण सांगणार? मग राजेंना विनंती करण्यात आली की राजे आपण स्टेज वर जाऊन लोकांना शांत सुखरूप पणे घरी जाण्याची विनंती करा. जे इतर राजकारण्यांना कळले होते ते संभाजीराजांना सुद्धा लक्षात आले होते. की आपण जर स्टेज वर गेलो, आणि आपल्या हातून एखादी जरी चूक झाली, तर आपलं राजकीय सामाजिक भवितव्य धोक्यात येऊ शकतं. राजेंनी स्पष्ट नकार दिला.
राजेंची ही भूमिका पाहून लगेच, मुंबई पोलीस चे अत्यंत वरिष्ठ असलेल्या अधिकारी साहेबांनी राजेंना विनंती केली. की महाराज आपण जर आज त्या स्टेज वर नाही गेला तर अनर्थ होईल. लहान मुलं आहेत, वृद्ध स्त्रिया आणि पुरुष आहेत. काही गोंधळ झाला तर अनेकांचा बळी जाईल. मुंबई मध्ये दंगल सुद्धा उसळण्याची शक्यता आहे. काही समाज कंटक लोक तिथे असं काही व्हावं म्हणून तयार बसले आहेत. मी आपली हात जोडून विनंती करतो की कृपा करून भोळ्या भाबड्या लोकांच्या जीवसाठी आपण स्टेज वर गेलेच पाहिजे.
ही विनंती ऐकून राजेंनी थोडा वेळ विचार केला. शेवटी छत्रपतींनी संकट काळातून मार्ग काढायचा असतो. राजकीय भवितव्य धोक्यात आलं तरी चालेल पण आपण लोकांचा जीव वाचवला पाहिजे. आपल्या पेक्षा आपला समाज महत्वाचा आहे ही शिकवण शिवछत्रपतींची आहे. ही खूणगाठ बांधून राजे स्टेज वर गेले. आणि केवळ सरकार ने ज्या काही मागण्या मान्य केल्या आहेत त्या मुली सांगतील आपण केवळ शांतपणे ऐकून घ्यावे असे विनम्रतापूर्वक आवाहन केले. आश्चर्य म्हणजे संपूर्ण समाज शांत पने घरी सुखरूप गेला. छत्रपती घराण्याची ताकद होती. आणि खऱ्या अर्थाने संभाजीराजांनी समाजाप्रती केलेल्या निस्वार्थ कार्याची ही पोचपावती होती.
संभाजराजांनी त्याही वेळी भाजप सरकार ला कोंडीत पकडले नाही, संधी असताना. याही वेळेस सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मराठा आरक्षण विरोधी लागला तरी राजेंनी सामंजस्याची भूमिका घेतली. लोकांना वेठीस धरणे किंवा स्वतःचं राजकीय भवितव्य सुरक्षित करणे हे असले डाव राजेंनी कधीच खेळले नाहीत. राजेंनी उलट एकीकडे आंदोलनाची धग वाढवून दुसरीकडे सरकार सोबत चर्चेने समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य दिले. त्यावेळी सुद्धा विरोधी पक्षातल्या लोकांना हायसे वाटले होते आणि यावेळी सध्याच्या विरोधी पक्षाला अडचण वाटत आहे.