मुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या पुस्तकात, सद्य:स्थितीतील हिंदुत्वाची तुलना ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ या दहशवादी संघटनांच्या जिहादी विचारांशी केल्यामुळे वाद सुरू आहे. याच वादावरून शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत यांनी यावरून संताप व्यक्त करताना म्हटले की, “सलमान खुर्शीद हे पुरुष वेशातील कंगना रणौत आहेत.”
भारताला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून भीक होती, खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले, असे वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केले आहे. पत्रकार परिषदेत या विषयावर बोलताना संजय राऊत म्हणालेत की, सलमान खुर्शीद यांनी हा खोडसाळपणा करून काँग्रेस आणि राहुल गांधींना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
तसेच या प्रकारची वक्तव्य करून काँग्रेस पक्षातील काही जुने जाणते म्हणवणारे नेते काँग्रेस आणि राहुल गांधींना सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात. ते विद्वान आहेत, पुस्तक लिहितात, एखादी ओळ हिंदुत्वावर टाकतात आणि वाद निर्माण करून आपल्या पोळ्या भाजतात. हिंदू धर्माला ‘आयसिस’ व ‘बोको हराम’ उपमा देणे हे कंगनाने केलेल्या देशाच्या अपमानासारखाच आहे.”
“हिंदुत्वाने काय केले आहे? काही लोक चुकीचे वागले असतील. जसे इस्लाम आणि इतर धर्मात झाले आहे. त्याचे खापर संपूर्ण हिंदुत्वावर फोडणे ही मूर्खांची लक्षणे आहेत. आम्ही याचा निषेध आणि धिक्कार करतो. काँग्रेसदेखील यावर भूमिका स्पष्ट करेल याची खात्री आहे, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.