कोल्हापूर | राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्रीपद सोडणार या चर्चेने पुन्हा वेग घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ते पद सोडण्याच्या विचारात आहेत आणि तशी कल्पना त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिल्याची चर्चा आहे त्यामुळे नागरिकाच्या पालकमंत्री पदावर आता कोणाची वर्णी लागणार हे पाहावे लागणार आहे.
दरम्यान, पालकमंत्री पदाचा बदल घडलाच तर त्यांच्या जागी कोण, असा प्रश्नही चर्चेत आला असून राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि अलिकडे जिल्ह्याच्या राजकारणात आक्रमक झालेल राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात सुरु आहे. पालकमंत्री म्हणून नगरला अधिक वेळ देणे मुश्रीफ यांना गेल्या २ वर्षाच्या काळात शक्य झालेले नाही. याबाबत आधी पक्षातूनच नाराजी होती. अलिकडे विरोधी पक्षातील नेत्यांकडून याबाबत यथेच्छ टीका सुरू झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीलाही अडचणीचा सामना करावा लागत आहे.
नगर हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुश्रीफ यांच्याकडे नगरच्या पालकमंत्रीपदाची सुत्रे सोपवून गटा-तटाच्या राजकारणातून वाट काढली होती. मात्र मुश्रीफांचे नगरमध्ये मन न रमणे राजकीयदृष्ट्या राष्ट्रवादीसाठीच धोक्याच ठरू पाहत आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात पालकमंत्री बदलाच्या चर्चा अनेकदा झडल्या. मात्र यावेळी स्थिती वेगळी आहे. स्वतः मुश्रीफ आता हे पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याचे म्हटले जात आहे. तशी इच्छा त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यातच याबाबत निर्णय होईल, असेही सांगीतले जात आहे.