मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे अधिवेशन नागपुरातच घ्यावे तसेच कालावधी वाढवून द्यावा अशी, मागणी त्यांनी केली आहे.
भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी ठाकरे सरकारवर याच मुद्दयावरून टीका केली आहे. उमा खापरे यांनी याबाबत ट्विट केले आहे. अधिवेशनापासून पळ काढण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा प्रयत्न. राज्य सरकारचे अधिवेशन फक्त ५ दिवसाचं… या पळ काढणाऱ्या बिघाडी सरकारला सत्ता तर हवी आहे, मात्र जनतेच्या प्रश्नांना तोंड द्यायची हिंमत नाही. अशी टीका उमा खापरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
यावर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर विधानसभा कामकाज सल्लागार समितीने याबाबत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. २० ते २५ डिसेंबर दरम्यान हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार असे मंत्री मंडळाने जाहीर केले होते. आता या टीकेला महाविकास आघाडी सरकार काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.