( मुंबई प्रतिनिधी ) मुंबईत पुन्हा एकदा रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे यापुढे मुंबई प्रवास करताना मुंबईकरांना खिसा आणखी खाली करावा लागणार आहे. रिक्षाचे भाडे १८ वरुन २१ रुपयांवर तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरुन २५ रुपये करण्याचा निर्णय झाला आहे. परिवहन आयुक्तांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र या निर्णयाला भारतीय जनता पक्षाने विरोध दर्शवत जोरदार टीका केली आहे. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी ‘कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारने हा बोजा लादला आहे असे म्हंटल आहे.
‘खटूवा समितीचा अहवाल ठाकरे सरकारने स्वीकारल्यामुळे १ मार्चपासून रिक्षा-टॅक्सीच्या दरात तब्बल ३ रुपयांची वाढ होणार आहे. कोरोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांवर ठाकरे सरकारने हा बोजा लादला आहे. धंदा कमी होईल या भीतीने अनेक रिक्षा-टॅक्सी संघटनांनी या भाडेवाढीला विरोध केला आहे’, असे ट्वीट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
परिवहन मंत्री अनिल परब यांनी पेट्रोलच्या किंमतीत झालेल्या वाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करीत असल्याचं जाहीर केलं. परंतु या भाडेवाढीचा पेट्रोल-डिझेलच्या दरातील वाढीशी काहीही संबंध नाही. मी अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२० मध्ये विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परिवहनमंत्री अनिल परब यांनी खटूआ समितीच्या शिफारशी राज्य सरकारनं स्वीकारल्या असून, भाडेवाढ होणार हे निश्चित असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे कोरोनाच्या अगोदरच भाडेवाढ करण्याचे ठाकरे सरकारनं ठरवले होते. त्याचा आता अंमलबजावणी केली जाणार आहे असे भातखळकरांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटलं आहे.