मुंबई : : हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सीन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लसीचे उत्पादन होण्यास मदत होणार आहे. या संदर्भात काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्रं लिहून हाफकिनसारख्या संस्थांना लस उत्पादनाची परवानगी देण्याची मागणी केली होती. या मागणीला केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. त्याबद्दल राज यांनी मोदींचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता १०० टक्के लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा देण्याची मागणी राज ठाकरेंनी पत्र लिहून पंतप्रधान मोदींकडे केली होती. काल रात्री यासंदर्भात मोदी सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता हाफकिनला कोरोनावरील लस उत्पादन करता येईल. राज्यातील कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होण्यास त्यामुळे मोठी मदत होईल.
राज ठाकरे यांनी या संदर्भात ट्विट केले आहे की, ‘१००% लसीकरणाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हाफकिन्ससारख्या संस्थेला लस उत्पादन करण्याची मुभा द्यावी ह्या माझ्या विनंतीला आपण मान्यता दिलीत ह्याबद्दल पंतप्रधानांचे मनापासून आभार. केंद्रसरकारकडून असंच सहकार्य मिळत राहिल्यास एकत्रितपणे आपण ह्या संकटावर सहज मात करू हे नक्की,’ असं राज ठाकरेंनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.