संपूर्ण राज्यात रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ सुजय विखे-पाटील यांनी खास विमानाने रेमडेसिवीर औषधाचा साधा आणला होता. त्यातच आता या विरोधात खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने आपले म्हणणे मांडावे, असे निर्देश देत याप्रकरणी २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
आज कोरोना रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा देशभरात प्रचंड तुटवडा आहे. एकेका इंजेक्शनसाठी रुग्णांची धावपळ होत असताना नगर येथील भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मात्र दिल्लीहून गुप्तपणे खासगी विमानाने १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला आणि त्याचे बऱयाच ठिकाणी वाटप केले होते. या संदर्भातील माहिती त्यांनी सोशल मीडियाच्या माद्यमातून दिली होती.
रेमडेसिवीर इंजेक्शनवर सध्या अनेक निर्बंध आहेत. असे असतानाही डॉ. सुजय विखे यांनी हा साठा विनापरवाना आणला असून त्याविरोधात नगर जिह्यातील सामाजिक कार्यकर्ते अरुण कडू, चंद्रभान घोगरे, बाळासाहेब विखे आणि दादासाहेब पवार यांनी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर येथील खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २९ एप्रिल रोजी होणार आहे.