भारतीय जनता पक्षाचे काही लोक काल शिवसेना भवनासमोर आले होते. त्यांनी तिथे राडा करण्याचा प्रयत्न केला. राडा करणाऱ्यांना शिवसैनिकांनी शिवप्रसाद दिला आहे. हा विषय प्रसादापर्यंतच मर्यादित राहू द्या, शिवभोजन थाळी देण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला दिला होता.
आता सामनातून करण्यात आलेल्या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी टीका केली आहे. शिवप्रसाद देणाऱ्यांनी कधी घराबाहेरही यावं. नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा संजय राऊतांची अवस्था काय झाली होती हे सांगायला नको. राऊतांनी शिवभोजनाची भाषा करू नये. मैदानात यावं. राऊत दोन पायांवर जाणार नाहीत हे मी ठामपणे सांगतो, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काल राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. त्यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. यावेळी शिवसैनिकही शिवसेना भवन येथे जमा झाले होते. यावर प्रतिक्रिया देताना आमदार सदा सरवणकर म्हणाले की, भाजपचे काही कार्यकर्ते हातात दगड आणि विटा घेऊन चाल करत होते. त्यांना शिवसैनिकांनी जशाच-तसे उत्तर दिले आहे.