पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी नाव आलेले शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खात्रीदायक सूत्राच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार राठोड यांनी कालच आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिला. यावर आता भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी भाष्य करत राठोड यांना टोला लगावला आहे.
दरेकर म्हणतात की, वनमंत्री संजय राठोड यांनी मतोश्रीवर पाठवलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे सुपूर्द करावा. तसंच, एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे, असे होता कामा नये. राजीनामा दिल्यानंतर निःपक्षपातीपणे चौकशी व्हावी, अशी मागणी दरेकर यांनी केली आहे.
टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येवरुन राजकारणात खळबळ उडाली आहे. पूजाच्या आत्महत्येला ठाकरे सरकारमधील मंत्री जबाबदार असल्याचा आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला होता. तसेच थेट संजय राठोड यांचं नाव घेत कारवाईची मागणी केली होती. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार अशी चर्चा असतानाच वनमंत्री संजय राठोड यांनी कालच आपला राजीनामा मातोश्रीवर पाठवून दिल्याची माहिती समोर आली होती.