कोल्हापूर | शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे यांना बुधवारी कोर्टाने सशर्त जामीन मंजूर केला. नितेश राणे आणि त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. हांडे यांनी प्रत्येकी ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.
नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला असला तरी न्यायालयाने त्यांच्यावर अटी घालून दिल्या आहेत. न्यायालयाच्या अटी नुसार त्यांना कणकवली तालुक्यात जाता येणार नाही. नितेश राणे यांना कणकवली न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक उपचारासाठी नेण्यात आलं होतं.
नितेश राणे यांना जामीन मंजूर झाला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. नितेश राणेंवर उपचार सुरु असताना त्यांच्या नियमित जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी निर्णय दिला. याबाबत माहिती देताना त्यांचे वकील संग्राम देसाई यांनी सांगितलं की, राणे व त्यांचे स्विय सहाय्यक राकेश परब यांना ३० हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे.