भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मानती सतत वादग्रस्त विधाने करून पक्षाला आणि स्वतःला अडचणीत आणायचा प्रयत्न करताना अनेकवेळा दिसून आले आहेत. त्यातच आता प्रभू श्रीरामाच्या नावाने मतांचे राजकारण करणाऱया भाजपच्याच आमदाराने प्रभू श्रीरामावर वादग्रस्त विधान केले आहेत. खटाव तालुक्यातील सातेवाडी येथे जाहीर सभेत बोलताना आमदार जयकुमार गोरे यांनी बेछूट बडबड केली. स्वतःची स्तुती करताना रामायणाचा दाखला देताना गोरे यांनी, ‘रामाची नियतच खराब होती,’ असे संतापजनक वक्तव्य केले.
आमदार गोरे यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. आता भाजप आपल्या आमदारावर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.वडूजजवळील सातेवाडी येथे आयोजित जाहीर सभेत आमदार जयकुमार गोरे यांना नेहमीप्रमाणेच आत्मप्रौढी सांगण्याचा मोह आवरला नाही. त्या नादात त्यांनी उपस्थितांना रामायणातील दाखला दिला, ‘राम-रावण युद्धात घायाळ होऊन रावण रणांगणावर कोसळला. त्यावेळी त्याने रामाला विचारले, माझ्याकडे एवढी प्रचंड सेना असताना तू जिंकलास कसा? त्यावर राम म्हणाला, तुझा भाऊ बिभीषण माझ्याकडे होता म्हणून मी जिंकलो!’ असे ते म्हणाले
इतके सांगून झाल्यावर आमदार गोरे म्हणाले, ‘माझ्याकडे तर भाऊ नसतानाही मी जिंकलो. कारण रामाची नियत खराब होती.’ हे अधोरेखित करण्यासाठी त्यांनी हेच वाक्य पुन्हा एकदा उच्चारले. दोनदा बेछूट बडबड केल्यानंतर आमदार गोरे यांना उपस्थितांनी चूक लक्षात आणून दिली. गोरे यांच्या या संतापजनक वक्तव्यामुळे त्यांच्यासह भाजपवर चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार सुरू झाला आहे.
सत्ता असेल तिकडे जाणाऱया गोरे यांनी २०१९ मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना क्षणात रामराम करून निष्ठची फुले देवेंद्र फडणवीसांच्या चरणी वाहिली. भाजपनेही अशा लोकांना पावन करून घेतले. पण ज्या प्रभू श्रीरामाच्या नावावर राजकारण करायचे, त्याच श्रीरामावर आमदार जयकुमार गोरे यांनी मुक्ताफळे उधळल्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. या जाहीर कार्यक्रमाला भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.