राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे उमेदवार संजय पवार, तर भाजपकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे दोन राजकीय नेते मैदानात उतरले आहेत. त्यात कोण कोणाला, कोणता डाव? टाकून पराभव करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आतापासूनच मतं मिळवण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शुक्रवारपर्यंत वाटाघाटी झाल्या. मात्र प्रथम कोणी माघार घ्यायची? ही बाब प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचं म्हणणं आहे की, महाविकास आघाडीनं राज्यसभेच्या सहाव्या जागेचा उमेदवार मागे घ्यावा. म्हणजे, ते विधान परिषदेचा उमेदवार मागे घेतील. तर महाविकास आघाडीचं म्हणणं होतं की, भाजपनं राज्यसभेचा उमेदवार मागे घ्यावा, म्हणजे ते विधान परिषदेसाठीचा एक उमेदवार मागे घेतील.
दरम्यान, राज्यसभेच्या चारही जागा महाविकास आघाडी जिंकणार, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. आता खेळ सुरू झाला आहे,असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण तिनही जागा जिंकणार, असा दावा भाजपनं केला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीबरोबरच आता विधान परिषदेची निवडणूक होणार, हे सुद्धा निश्चित झालं आहे. त्यासाठी आता मतांची जुळवाजुळव करण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडी कामाला लागली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी सातव्या उमेदवाराला जिंकून देण्यासाठी अपक्ष आमदार आणि काही संघटनांच्या आमदारांना फोनाफोनी करायला सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात भाजप उमेदवार असलेले धनंजय महाडिक यांची आणि काही नेत्यांची देखील भाजप प्रदेश कार्यालयात बैठक पार पडली. यामध्ये आवश्यक असणारी मतं कशी मिळवणार? याची स्ट्रॅटेजी आखण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.