मुंबई | राज्यसभा निवडणुकीच्या अप्र्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी असा सामना रंगलेला दिसून आला आहे अशातच दोन्ही बाजूंकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या तयारीची बैठक रविवारी झाली. राज्यसभा निवडणुकीची पूर्वतयारी झाली असून, सर्व रणनीती, कार्यपद्धतीची ब्लू प्रिंट तयार असल्याचे भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी या बैठकीनंतर माध्यमांना सांगितले.
महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीसाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भाजपने निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. रेल्वेमंत्री वैष्णव रविवारी मुंबईत दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत भाजप कार्यालयात निवडणूक रणनीतीबाबत महत्त्वाची बैठक झाली. बैठकीला वैष्णव यांच्यासह केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार पीयुष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
भाजपचा तिसरा उमेदवार जिंकणार आणि शिवसेनेच्या संजयचा पराभव होणार, असे शेलार म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. याबद्दल विचारले असता, रोज सकाळी उठून बोलणाऱ्या संजय राऊत यांचे बोलणे हे पोरकटपणाचे आहे. त्यांना कदाचित स्व पक्षाचा पराभव दिसत असेल, त्यामुळे ते असे बोलत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा वापर होत असल्याचा आरोप बिनबुडाचा आहे. स्वत:चा आणि पक्षाचा पराभव दिसत असल्यानेच राऊत यांनी आतापासून कारणांची पेरणी करण्याचे काम चालू केले आहे.