अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडूनच राजशिष्टाचाराचा भंग झाला. अभिभाषणादम्यान राज्यपालांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांचे नाव घेताच सत्ताधारी बाकावरून ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा घुमल्या.त्याच वेळी विरोधकांनी ‘दाऊदच्या दलाल मंत्र्याचा राजीनामा घ्या’ अशा घोषणा देत बॅनर झळकवत सभागृहात एकच गोंधळ घातला.
विरोधकांचा सभागृहातील अभूतपूर्व गोंधळ आणि आततायीपणा यामुळे व्यथित झालेल्या राज्यपाल महोदयांनी आपले अभिभाषण अवघ्या दीड मिनिटात आटोपत विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहातून काढता पाय घेतला. अभिभाषणाचे वाचन अर्धवट करून राज्यपाल कोश्यारी यांनी राजशिष्टाचाराचा भंग तर केलाच, याशिवाय अभिभाषण संपल्यावर होणाऱया राष्ट्रगीताचीही वाट न पाहता राष्ट्रगीताचा अवमान केला. राज्यपालांच्या या कृतीचा समाजातील सर्व स्तरांतून निषेध केला जात आहे.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन प्रथेप्रमाणे राज्यपालांच्या अभिभाषणाने सकाळी 11 वाजता सुरू झाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संयुक्त सभागृहात प्रवेश केल्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा सत्ताधारी बाकावरून देण्यात आल्या. राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषण वाचण्यास सुरुवात केली. माझे शासन, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा उल्लेख राज्यपालांनी करताच सभागृहात ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या घोषणा घुमल्या. या वेळी राज्यपालांना पुढील अभिभाषण वाचावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहात शांतता राखण्याचा हातानेच इशारा केला आणि सत्ताधारी बाकावरील सदस्य शांत झाले.
दरम्यान, विरोधी पक्षाच्या सदस्यांनी मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत राज्यपालांच्या अभिभाषणात अथडळे आणण्याचा प्रयत्न केला. विरोधी सदस्य काही केल्या शांत होत नसल्याने राज्यपाल कोश्यारी हे अभिभाषणाचे वाचन अर्धवट सोडून सभागृहातून तडकाफडकी निघून गेले. अभिभाषणाची सुरुवात आणि शेवट हा राष्ट्रगीतानेच होत असतो, मात्र राज्यपालांना याचेही भान राहिले नाही.