राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या अनेक मुद्द्यावरून खटके उडत असल्याचे चित्र दिसून येत आहे अशातच आता केंद्राकडून राज्याला येणाऱ्या परताव्यावरून मुख्यमंत्र्यांच्या टीकेला केंद्रीय मंत्र्याने सोडतोड प्रतिउत्तर दिले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे केंद्राकडे बोट दाखवून आमचे एवढे पैसे शिल्लक आहेत, तेवढे पैसे शिल्लक आहेत असं सांगत फिरतात. पण राज्याचे केंद्राकडे नाही तर केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी असल्याचे वक्तव्य केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी केलं आहे.
महाविकास आघाडी सरकारनेच राज्यात महागाई वाढवली असल्याचेही भागवत कराड म्हणाले. परभणीत जेष्ठ शेतकरी शेषराव भरोसे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय कृषी संजीवनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं उदघाटन भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते.
महाराष्ट्रासारख्या देशाच्या विकासात सर्वात मोठे योगदान देणाऱ्या राज्याला आर्थिक बाबतीत सापत्न वागणूक दिली जात असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या टिकेनंतर भाग भागवत कराड यांनी राज्य सरकारवरच टीका केली आहे.
केंद्राचेच राज्य सरकारकडे पैसे बाकी असल्याचे कराड यांनी म्हटले आहे. तसेच आपल्या भाषणात भागवत कराड यांनी महागाईवरुन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला. भाजपचे तर आमदार बबनराव लोणीकर यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. हे महाविकास आघाडीचे सरकार हे बिघाडी असून, सर्व योजना बंद करण्याचे काम केले जात असल्याचा आरोप लोणीकर यांनी केला. दरम्यान, शेतकऱ्यांना 50 हजार कोटी रुपये देणार स्वातंत्र्याच्या इतिहासातील फडणवीस सरकार हे एकमेव सरकार असल्याचेही बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले