पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘अमित शाह आणि भाजपाची वाटचाल’ या मराठीत अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते झाले होते. कार्यक्रमासाठी बालगंधर्व सभागृहात स्मृती इराणींचा सत्कार सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केली होती.
या घटनेनंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीच्या गोंधळ घालणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांना मारहाण केली. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या वैशाली नागवडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून भाजपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर काल वैशाली नागवडे आणि इतर महिलांना झालेल्या मारहाणीची महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास त्वरित सादर करण्याचे निर्देश रुपाली चाकणकर यांनी पुणे पोलिसांना दिले आहेत. या दखलनंतर तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात उडी घेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून पोस्ट केली आहे.
देसाई म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे नाव बदलून “राष्ट्रवादी महिला आयोग” केले पाहिजे. कारण महिला आयोगाच्या अध्यक्षा कारवाई करताना वारंवार भेदभाव करताना दिसत आहेत. असा निशाणा साधत त्यांनी रुपाली चाकणकर यांच्या कामावर टीका केली आहे.