पिकवलेले विकण्यासाठी शेतकरी आत्महत्या करु लागला आहे. राज्यकर्त्यांनो तुम्हाला बळीराजाच्या मुडद्यावर राज्य करायच आहे काय? असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. बीड जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कारखान्याला ऊस जात नसल्याने उसाच्या फडाला आग लावून, गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यावरुन राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून, आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. ऊस जात नसल्याने एका 35 वर्षीय तरुण शेतकऱ्याने उसाच्या फडाला आग लावून त्याच फडातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.नामदेव जाधव (रा. हिंगनगाव ता. गेवराई ) यांना दोन एकर शेती असून, त्यांनी आपल्या शेतात 265 जातीचा ऊस लावलेला आहे.
आज ऊस लागवडीसाठी एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला. मे महिन्याचा दुसरा आठवडा आलेला असतानाही ऊस जात नसल्याने जाधव हे नैराश्येत राहत असत. कारखानदारांकडे अनेक वेळा चकरा मारुनही त्यांचा ऊस गाळप होत नसल्याने त्यांनी उसाचा फड पेटवत त्याच फडात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याचे राजू शेट्टी म्हणाले.
बीड जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा प्रश्न पेटला असून जिल्ह्यात अतिरिक्त उसाचा पहिला बळी गेला आहे. तोडणीला आलेला ऊस कारखाना घेऊन जात नसल्याने 30 वर्षीय तरुण शेतकऱ्याने चक्क ऊस पेटवून देत ऊसातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यातील हिंगणगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. नामदेव आसाराम जाधव असे गळफास घेतलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.