मुंबई : राज्यात मराठा आक्षणाचा मुद्धा चांगलाच गाजत असताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्याशी भेट घेऊन मराठा आरक्षण संदर्भात चर्चा केली होती. याच मुद्द्यावरून भाजपा नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी संताप व्यक्त करत थेट छत्रपती संभाजी राजेंना ट्विट करून खडेबोल सुनावले आहेत. या संदर्भात ट्विट करून त्यांनी ही टीका केली आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, संभाजीराजेंच्या मनात काय भलतच दिसतयं. पवार साहेब आणि महा विकास आघाडीच्या जवळ जायचं असेल तर खुशाल जावं, पण मराठा आरक्षणाचा विषय स्वतःसाठी वापरू नका. राजे, वाटेल तसा आरक्षणाचा विषय वापरायला मराठा समाजाने तुम्हाला ठेका दिलेला नाही, अशा शब्दांत निलेश राणेंनी संभाजीराजेंवर टीका केली आहे. या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेतला. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये भेटी देत त्यांनी भावना जाणून घेतल्या. त्या अंतर्गतच त्यांनी गुरुवारी शरद पवारांचीही भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी पवारांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचंही संभाजीराजे यांनी सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी पुन्हा एकदा सर्व नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.