औरंगाबाद येथील सभेत
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाण साधला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सांस्कृतिक सरचिटणीस सुरेखा पुणेकर यांनीही राज ठाकरेंना लक्ष केले आहे. राज ठाकरे हे चौरंगी चिरा आहे. त्यांनी व्यवस्थित राजकारण केले पाहिजे. ठाकरेंनी आता कुठे तरी थांबायला पाहिजे. कोणाचीतरी टीका करून जातीपातीचे राजकारण करण्याचे प्रकार ते करत आहेत, ते थांबविले पाहिजे, असे सुरेखा पुणेकर म्हणाल्या आहेत.
काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची औरंगाबादमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी मागील सभेप्रमाणेच शरद पवार तसेच एकूण राष्ट्रवादीवर टीका केली. शरद पवार हे जातीयवादी असल्याची टीका त्यांनी कालच्या सभेतही केली. त्यावर सुरेखा पुणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवारसाहेबांवर टीका करताना किमान विचार करायला हवा, असेही त्या म्हणाल्या.
आपल्या देशात सर्वप्रथम महिला धोरण आणले ते महाराष्ट्र राज्याने. त्यात शरद पवारांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे महिला विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मोठमोठ्या पदांवर आहेत. शरद पवारांनी विविध जातीच्या लोकांना सोबत घेऊन काम केले. पक्षातही विविध पदांवर विविध जातीचे लोक आहेत. जात मानणारे असते, तर असे कधी पहायला मिळाले असते का, असा सवालही त्यांनी केला. उलट राज ठाकरेच जातीपातीचे राजकारण करतात, असा पलटवार त्यांनी केला. शरद पवार तळागाळातील लोकांबरोबर काम करणारे, ओळखणारे नेते आहेत, असेही त्या म्हणाल्या.