पुणे | महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया आल्या. राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतानाच ही भूमिका मनसेला अडचणीची ठरताना दिसत आहे. कारण, राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेनंतर राज्यभरातील विविध विभागातील मनसे कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करण्यास सुरुवात केली आहे.
मनसेने मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधातील भूमिकेनंतर मुंबई आणि मराठवाड्यातील एकूण 35 कार्यकर्त्यांनी पक्षाला राजीनामा दिला आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर एका मागे एक मनसेतील मुस्लिम कार्यकर्ते पक्ष सोडत असल्याने याचा काहीसा फटका आगामी मनपा निवडणुकांत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशीद वरती भोंगे लावले तर समोर हनुमान चालीस लावा असे सांगितल्यानंतर अनेक ठिकाणी मनसे हनुमान चालीस लावले. मात्र, राज ठाकरेंनी केलेल्या या विधानानंतर पुण्यातील मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पुण्यातील माझीद अमीन शेख हे मनसेच्या वॉर्ड क्रमांक 84 शाखेचे अध्यक्ष आहेत. अमीन शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून बेरोजगारी, महागाई, शिक्षण यासारखे विषय असताना हे मुद्दे सोडून जात-धर्म या विषयांवर भर दिला जात आहे, या कारणास्तव मी राजीनामा देत आहे असं अमीन शेख यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.