ठाणे | मनसेप्रमुख राज ठाकरे यांची उत्तरसभा संध्याकाळी असली तरीदेखील ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजताच ठाण्यात हजेरी लावणार असल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली. सायंकाळी होणारी वाहतूककोंडी लक्षात घेऊन ते दुपारीच ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. यावेळी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात ते मनसे पदाधिकाऱ्यांशी आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहेत.
मात्र तत्पूर्वी या सभेची जोरदार तयारी मनसेकडून सुरू आहे. त्यातच, ठाण्यातील मनसे विभाग अध्यक्षाने लावलेला डिजिटल फलक चर्चेचा विषय बनला आहे. ठाण्यातील विभाग अध्यक्ष महेश कदम यांनी राज ठाकरेंच्या सभेसंदर्भातील एका डिजिटल बॅनर लावला आहे. विशेष म्हणजे तो बॅनर हिंदीत लिहिला असून त्यावर हिंदूओंका राजा, अशी उपाधी राज ठाकरेंना देण्यात आली आहे.
मुंबई मे बैठा है हिंदूओंका राजा !
अपनी हिफाजत चाहिए तो मनसे मे आजा !!
मनसेनं गेल्या काही वर्षांपासून थेट हिंदुत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला आहे. मराठीच्या मुद्द्यावरुन मनसेनं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन राजकारण सुरू केल्याचं दिसून येत आहे. त्यातूनच, मनसेनं पक्षाचं झेंडा आणि हिंदूत्त्वाची विचारधारा धरल्याचं अनेक कार्यक्रमातून पाहायला मिळत आहे. तसेच लवकरच राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याचे सुद्धा सांगण्यात आले होते.