औरंगाबादच्या एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे इशारा करत ‘भावी सहकारी’ असा उल्लेख केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आलं आहे. त्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी या विधानाचा आपल्या सोयीने अर्थ काढला होता. आजच्या दिवशीच मराठवाड्याला निजामाच्या तावडीतून मुक्तता मिळाली होती. म्हणून औरंगाबाद येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, मंत्री बाळासाहेब थोरात हे कार्यक्रमाला उपस्थित होते.
रावसाहेब दानवे कार्यक्रमाला आहेत म्हणल्यावर टोलेबाजी ठरलेलीच असते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी आपल्या खास शैलीत रावसाहेब दानवे यांची फिरकी घेतली होती. तसेच मंचावर उपस्थित आजी-माजी आणि पुढे भविष्यात एकत्र आलो तर आमचे भावी सहकारी, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पहिल्यांदाच भाजपला खुली ऑफर दिल्याचं पहायला मिळालं.
मला रेल्वे का आवडते कारण रेल्वेला रूळ असतात, रूळ सोडून इंजिन कुठेही जात नाही. रुळ सोडून इकडे तिकडे कुठेही जाऊ शकत नाही. त्याला डायव्हर्जन मारलं तर आमच्या स्टेशनवर येऊ शकता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आता उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर भाजपा नेते काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.