पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर असून पुण्याला मोठा ऐतिहासिक वारसा देखील लाभला आहे. मात्र, पुण्याची ओळख म्हणजे फक्त शनिवारवाड्यापर्यंतच मर्यादीत राहिलेली दिसत असते. अशातच राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावरील फोटो शेअर करत एअरपोर्ट अॅथरिटीवर चांगलीच टीका केली आहे.
पेशव्यांच्या पराक्रमाविषयी आदर आहेच, परंतु पुण्यात केवळ शनिवारवाडा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा लाल महालसुद्धा आहे, पुण्यात सिंहगड देखील आहे आणि याच पुणे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी देखील आहे, असं ट्विट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.
शिवनेरी तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदानस्थळ वढू तुळापूर देखील आहे. या सर्व गोष्टींचा पुणे एअरपोर्ट अॅथरिटीला विसर पडला की काय?, असा प्रश्न ट्विटच्या माध्यमातून अमोल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे. अमोल कोल्हे यांनी पुणे विमानतळावरचे काही दोन आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहे.