मुंबई | पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिक तसेच पोलिसांमध्ये बाचाबाची झाली होती, याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला आहे.
पावसाळ्यात कारवाईला परवानगी नसतानाही स्थानिक लोकांची पर्वा न करता थेट वस्तीत जेसीबी घुसवला. पुणे महापालिकेचे हे काम महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नसून, अधिकाऱ्यांचं असं भयंकर वागणं हे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडा देण्यासारखं असल्याचं संजय राऊत म्हणालेत.
पुणे मनपाने काल जे काम केलं, त्याचा मी निषेध करतो. प्रशासनाने सत्ताधारी यांच्या सल्ल्याने घाईघाईने निर्णय घेत. कोणाचीही पर्वा न करता घरांवर जेसेबी फिरवला. निदान लोकांचा आक्रोष आणि विरोध पाहून तरी माणुसकी दाखवली पाहिजे होती असं मला वाटतं, असं राऊत म्हणाले आहेत.
कारवाई केलेल्या ठिकाणी सत्ताधारी राजकीय नेते, नगरसेवक त्या ठिकाणी फिरकले देखील नाही. वस्तीतून लहान मुलांपासून ते वृद्धांचा संताप दिसून आला. त्यांना या सगळ्यांची कोणतीच पूर्वकल्पना न दिल्याचं तेथिल नागरिक म्हणत आहेत. महापालिकेत सत्ता कोणाचीही असो. प्रशासनाने इतक कठोर होता कामा नये, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.