मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी होणाऱ्या औरंगाबाद येथील सभेसाठी परवानगी देण्यात आली असली तरी, सभेवर काही अटी सुद्धा लावण्यात आलेले आहेत. पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेवर एकूण सोळ अटी लावल्या आहेत. यापैकी एक अट म्हणजे ‘सभेच्या जागेची क्षमता ही १५ हजार लोकांची असल्यामुळे, १५ हजार पेक्षा जास्त लोकांना निमंत्रित करू नये. आता यावर केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
नारायण राणे म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्या सभेला नेहमी १२ हजार ते १३ हजार लोक जमतात. म्हणून आपल्या पेक्षा इतर कोणाचीही सभा मोठी होऊ नये, यामुळेच राज ठाकरेंच्या सभेवर १५ हजार संख्येचं बंधन घातलं आहे, असा आरोप करून नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. नारायण राणे हे सिंधुदुर्गात पत्रकारांशी बोलत होते.
तसेच, राणे यांनी भाजप मनसे संभाव्य युतीवरही भाष्य केले. भाजप हा विशाल समुद्रासारखा पक्ष आहे आणि समुद्राला छोट्या छोट्या नद्या येऊन मिळतात. समुद्रात एखादी नदी विलीन होते तेव्हा समुद्र सहज स्विकारत असतो, असे म्हणत नारायण राणे यांनी भाजप – मनसे युतीवर सूचक इशारा दिला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात काही काम केले नाही. राज्यात जनतेची कामे करण्यास सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. म्हणून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे नारायण राणे म्हणाले.