नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पाच वाजता देशातील जनतेला संबोधित करणार आहेत. त्यामुळे आज नरेंद्र मोदी सायंकाळी काय बोलणार याकडे सर्वनाचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या देशात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. काही दिवसापासून करोनाबाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र दररोजचा मृतांचा आकडा वाढणारा दिसून येत आहे. त्यामुळे देशातील सध्याच्या परिस्थितीवर पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पंतप्रधान मोदी देशाला संबोधणार म्हटले की, अनेकांची उत्सुकता शिगेला पोहोचते. यापूर्वीही पंतप्रधान मोदींनी देशाला अनेकदा संबोधित केले आहे. तसेच त्या-त्यावेळी अनेक निर्णय जाहीर केले आहेत. अशातच आज संध्याकाळी मोदी देशवासियांना संबोधित करताना काय बोलणार? या संदर्भात अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. अशातच देशातील कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तसेच कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन केलेली अनेक राज्य अनलॉकच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. तसेच अनेक राज्यांनी निर्बंध शिथील करण्याचा निर्णयही घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मोदी पुढे काय काळजी घेतली जावी, यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव अधिक दिसून आला आहे. अशातच पहिल्या लाटेत देशवासियांसाठी मोदी सरकारने काही आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. अशाच पद्धतीने दुसऱ्या लाटेसाठी काही विशिष्ठ क्षेत्रांसाठी मोदी मोठी घोषणा करु शकतात. तसेच काही विशिष्ट क्षेत्रांसाठी सवालही जाहीर करण्याची शक्यता आहे.