पुणे | उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात झालेल्या हिंसाचारणानंतर एकूण ९ शेतकऱ्यांना आपला प्राण गमवावा लागला होता. या हिंसाचारा वरून देशभरातून संतापाची लाट उसळत आहे. अगदी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यासह अनेकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यातच आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लखीमपूर खिरी हिंसाचारावर संताप व्यक्त केला असून, पंतप्रधान मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत, अशी टीका केली आहे.
लखीमपूर हत्याकांडासारखी प्रकरणे आम्ही कधीच सहन करणार नाही. असा कुठलाही अन्याय कोणत्या महिलेवर आणि शेतकऱ्यांवर होणार असेल तर कोणाचीही सत्ता असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस कधीच सहन करणार नाही. तिथे लोक शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत होते. त्यांच्यावर झालेला हल्ला उत्तर प्रदेश सरकारनेच केला आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लखीमपूर हिंसाचारावर आपले म्हणणे मांडले आहे. शरद पवार यावर बोलले असून, हीच पक्षाची भूमिका आहे. आम्ही खंबीरपणे कुठल्याही अन्यायाच्या विरोधात उभे राहणार. प्रियांका गांधी तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलजी यांच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. लखीमपुरमध्ये एवढे सगळे होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकरणावर काहीच न बोलल्याचे आश्चर्य वाटते. ते कधीच अशा प्रकरणांवर बोलत नाहीत असेही त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.