मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना दुकसरीकडे खासदार छत्रपती संभाजी राजेंनी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. तसेच त्यांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. तसेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पत्रकार परिषदेत भाष्य सुद्धा केले होते. या दोन्ही नेत्यांच्या भेटीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे.
येत्या निवडणुकीत वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि संभाजीराजे छत्रपती एकत्र आल्यास त्याचा फटका पेशवाईला बसेल, शिवशाहीला नाही, असं नाना पटोले म्हणाले. ते अमरावतीत बोलत होते. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि कोरोना रुग्णालयांना भेट देण्यासाठी नाना पटोले सध्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट केली असून, नक्षलवादी हे लोकतांत्रिक पद्धतीचा विरोध करतात, त्यामुळे त्यावर बोलणे योग्य नाही असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.
नाना पटोले यांच्याकडून प्रकाश आंबेडकर यांच्याशी आघाडी करण्याचे संकेत आहेत. त्या अनुषंगाने पटोले यांना विचारण्यात आलं, त्यावर नाना पटोले म्हणाले, “संभाजीराजे छत्रपती आणि वंचित आघाडी एकत्र आले तर त्याचा फटका शिवशाहीला नव्हे तर पेशवाईला बसेल” असे सूचक विधान करत नाव न घेता भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे.