मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेलं वादग्रस्त विधान केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केल्यानंतर शिवसेना तसेच युवासेना आक्रमक झाली आहे. राणेंच्या विधानाप्रकरणी महाड, पुणे आणि नाशिकमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. राणेंचं विधान गंभीर असून त्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर करण्याचे आदेश नाशिक पोलिसांनी दिले होते. त्यावरुन, आता भाजपही आक्रमक झाल्याचे दिसून येते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नारायण राणेंच्या पाठिशी असल्याचं म्हटलंय.
नाशिक पोलिसांचं पथक राणेंच्या अटकेसाठी रवाना झालं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राणेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेची उडी कुठपर्यंत जाते ते बघू. केंद्रात आमचीच सत्ता आहे, असा इशारा राणेंनी दिला आहे. त्यानंतर, आता फडणवीसांनी कायद्याची भाषा बोलून पोलिसांना चांगलंच सुनावलं आहे. हा अदखलपात्र गुन्हा असून तो दखलपात्र होण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला आहे.
फडणवीस म्हणाले की, राणेंच्या वक्तव्याचं आम्ही समर्थन करणार नाही. पण, सरकार ज्याप्रमाणे बेकायदेशीरपणे गैरवापर करतेय ते पाहता, भाजपा नारायण राणेंच्या पाठिशी आहे. फडणवीस यांनी नाशिक पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण केले आहेत. शरगील उस्मानी महाराष्ट्रात येऊन भारतमातेला शिव्या देतो, हिंदूंना खूनी म्हणतो. तेव्हा कारवाई होत नाही, तेव्हा शेपट्या टाकतो.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, याठिकाणी अख्ख पोलीस फोर्स नाशिकहून निघालय, पुण्याहून निघालंय. खरं तर, कायद्याच्या भाषेत हा गुन्हा दखलपात्र नाही, पण त्याला गुन्ह्यात कनव्हर्ट केलंय. मी आयुक्तांचं पत्र वाचलं, ते काय स्वत:ला छत्रपती समजतात का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे. जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा… कोणत्या कायद्याने हा अधिकार दिला, असेही फडणवीस म्हणाले.