फडवणीस सरकारच्या काळात झालेलं फोन टॅपिंगचं प्रकरण भाजपाला चांगलाच भोवण्याची चिन्हे दिसत आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आगामी अधिवेशनापर्यंत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेशही दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहेत.
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी फोन टॅपिंग प्रकरणाचा मुद्दा चांगलाच गाजला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधिमंडळात आज फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला. २०१६-१७ मध्ये राज्यातील आमदार खासदारांचे फोन टॅप करण्यात आले होते. समाजविघातक कृत्यांवर आळा घालण्याच्या नावाखाली हे फोन टॅपिंग करण्यात आले, यासाठी माझा फोन नंबर ‘अमजद खान’ नावाने टॅप करण्यात आला. त्यामुळे फोन तापपिंग प्रकरणात यामागचा सुत्रधार कोण? याची चौकशी करण्याची मागणी पटोले यांनी सभागृहात केली.
अमली पदार्थांची तस्करी करत असल्याचे दाखवून माझा फोन टॅप करण्यात आला. नंबर माझा आणि अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवण्यात आले. मुस्लीम धर्माचे नाव देऊन हिंदू मुस्लीम वाद निर्माण करुन राजकारण करायचे होते काय? माझ्यासह इतर काही लोकप्रतिनिधींचे फोनही टॅप करण्यात आले. अशा प्रकारे लोकप्रतिनिधींचे फोन टॅप करणे ही सर्वांसाठी धोक्याची घंटा आहे.
लोकप्रतिनिधींना सार्वजनिक जीवनातून बरबाद करण्याचे काम करण्याचा हा प्रयत्न आहे. सभागृहातच अनिल देशमुख करु, भुजबळ करू, अशा धमक्या दिला जात आहेत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे, असं पटोले म्हणाले.